शिक्षणाद्वारे स्त्रियांना स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने द्रष्टे समाजसुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १८९६ सालात ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. ‘स्त्री शिक्षण आणि राष्ट्रीय प्रगती परस्परपूरक आहेत’ हा महर्षी कर्व्यांचा विश्वास होता, म्हणूनच सुरुवातीपासून ‘शिक्षणातून महिला सक्षमीकरण’ हे उद्दिष्ट घेऊन संस्था काम करते आहे.
प्रारंभी महर्षी कर्वे यांनी बालविधवांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘अनाथ बालिकाश्रम’ या नावाने संस्थेची सुरुवात केली. हा ‘अनाथ बालिकाश्रम’ दि. १४ जून १८९६ या दिवशी सुरू झाला. पुण्यापासून ४ किमी अंतरावरील हिंगणे गावातील छोट्या जमिनीच्या तुकड्यावर उभारलेली इवलीशी झोपडी हीच संस्थेची पहिली वास्तू होती. प्रारंभी या जागेत केवळ ४ मुलींनी प्रवेश घेऊन शिक्षण सुरू केले. मात्र या पवित्र कार्याने हळूहळू समाजाचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आणि यथावाकाश लोकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळु लागला. पुढे याच परिसरात एक शाळा आणि मुलींचे वसतिगृह बांधले गेले. जसजसे लोक संस्थेच्या कामाशी परिचित होत गेले, तसतसे लोकांच्या मनातील शंका व गैरसमज दूर होऊ लागले आणि संस्थेला समाजाचे सहकार्य मिळु लागले. हे काम अविरत पुढे जात राहण्यासाठी समर्पित स्वयंसेवकांची आवश्यकता होती. या गरजेमुळे ‘निष्काम कर्म मठ’ नावाची आणखी संस्था उदयास आली. कालौघात या संस्थेचे मूळ संस्थेत विलीनीकरण झाले. अर्थात नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्या आजीवन सेवकांची परंपरा मात्र संस्थेत चालूच राहिली.
कालांतराने १९२२ मध्ये सातारा इथे आणि १९२५ मध्ये वाई इथे मुलींच्या शाळा सुरू झाल्या. १९४५ सालात भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालय सुरू झाले. १९४९ साली संस्थेचे ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’ असे नवे नामकरण झाले. पुढे आणखी काही पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांची भर संस्थेच्या पसाऱ्यात पडली. १९९० चे दशक संस्थेच्या इतिहासातील मैलाचा दगड म्हणता येईल असे लक्षणीय ठरले. काळाची गरज ओळखून संस्थेने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले. या अंतर्गत १९९० साली श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय, नंतर १९९१ मध्ये कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय, १९९४ साली डॉ. भानूबेन नानावटी वास्तुशास्त्र महाविद्यालय, १९९५ साली श्री. मणीलाल नानावटी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, १९९६ साली हिराबेन नानावटी व्यवस्थापन आणि संशोधन संस्था, १९९८ मध्ये स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि २००० साली बकुळ तांबट इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग ही एकके एका मागोमाग एक सुरू झाली. या सर्व महाविद्यालयांनी आपापल्या क्षेत्रात स्वत:चे एक अजोड स्थान निर्माण केले आहे.
सध्या संस्थेचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले असून त्याद्वारे ३२,००० हून अधिक मुलींना शिक्षणाचा लाभ होत आहे. १२५ वर्षांहून अधिक जुनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था सध्या आपल्या ६५ शैक्षणिक एककांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाच्या कार्यात अग्रेसर आहे. ही एकके पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर आणि कामशेत या ठिकाणी केवळ मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत आहेत.
आजही ग्रामीण भागातील मुलींना गरीबी, असुरक्षित वातावरण, परिसरात शाळांची अनुपलब्धता, अशा कारणांमुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागते. परिणामी आपले संपूर्ण आयुष्य त्यांना शिक्षणाविनाच व्यतीत करावे लागते. महर्षी कर्वे संस्था अशा मुलींच्या पाठीशी एक सक्षम आधार म्हणून ठामपणे उभी आहे. संस्थेने शिक्षणाच्या माध्यमातून वेळीच आधार देऊन सक्षम आणि स्वावलंबी बनविल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक होतकरू, परिश्रमी, बुद्धिमान आणि गुणी मुली व महिला आता एक सन्मानाचे आयुष्य जगत आहेत.
मार्गात अनेक अडथळे असले तरीही विद्यार्थिनींची प्रगती आणि विकास हे संस्थेचे सर्वोच्च प्राधान्य असून आजवर याच मार्गावर संस्थेची यशस्वी वाटचाल चालू आहे आणि त्या आधारावर संस्थेने आपले एक वेगळे स्थान समाजात निर्माण केले आहे, हे अभिमानाने सांगावेसे वाटते. महर्षी कर्व्यांची दूरदृष्टी आणि इथले व्यवस्थापन मंडळ व सर्व पातळीवरील कर्मचारी वर्ग यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, समर्पण, निर्धार आणि धोरणात्मक दृष्टी यांच्या संयोगाने आजच्या स्पर्धात्मक युगातही महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी झाली आहे.